Monday, September 16, 2013

श्री सूर्या समूह ची चिटफंड चीटिंग:‘श्री सूर्या’चे गुंतवणूकदार अस्वस्थ

आरोप : उलटसुलट चर्चेला उधाण
नागपूर : रक्कम परत घेण्यासाठी जमा झालेल्या हजारो गुंतवणूकदारांना हुसकावून लावले जात असल्यामुळे श्री सूर्या समूहाच्या गुंतवणूकदारांत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. श्री सूर्या समूहाचे समीर जोशी यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवल्यामुळे समूहाने नादार झाल्यापर्यंतची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

हजारो गुंतवणूकदार आणि शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी गोळा करणार्‍या श्री सूर्या समूहाने अल्पावधीतच वेगवेगळ्या क्षेत्रात धडाकेबाज जाहिरात केली होती. सुपर मार्ट, खाद्य तेल, बेकरी आणि कुकीजच्या उत्पादनासोबतच समूहाने जीम, स्पा-सलून, ट्रान्सपोर्टिंगही सुरू केले. प्रत्येक उत्पादनाला व सेवेला प्रतिसाद आणि घवघवीत नफा मिळत असल्याचा दावा समूहाचे समीर जोशी करीत होते. मोठी रक्कम गुंतविल्यास मोठा लाभ होऊ शकतो, असे सांगून त्यांनी दोन ते अडीच वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते.

गुन्हे शाखेकडून चौकशी
विशेष उल्लेखनीय म्हणजे, श्री सूर्या समूहाच्या संशयास्पद व्यवहाराबाबत भ्रष्टाचार विरोधी जन मन संघटनेचे संजय अग्रवाल यांनी रिझर्व्ह बँक, सेबीकडे माहितीच्या अधिकारात या कंपनीला ठेवी गोळा करण्याची परवानगी दिली काय, अशी विचारणा केली होती. त्यांच्याकडून नकारार्थी उत्तर आल्यामुळे अग्रवाल यांनी प्राप्तिकर खात्याकडे तसेच गंभीर गुन्हा तक्रार कार्यालय नवी दिल्ली यांच्याकडे तक्रारी करून चौकशीची मागणी केली होती.

मात्र, त्यांच्याकडून चौकशी न झाल्यामुळे आज गुंतवणूकदारांवर भलतीच वेळ आली आहे. दरम्यान, अनेक गुंतवणूकदारांनी गुन्हेशाखेकडे श्री सूर्या समूहाच्या तक्रारी केल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू असल्याचे गुन्हेशाखेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांची रक्कम द्यायची आहे : समीर जोशी
मला सर्वच्या सर्व गुंतवणूकदारांची रक्कम परत करायची आहे. कुणाचाही पैसा बुडवायचा नाही. काही हितशत्रू आणि प्रतिस्पध्र्यांनी मला बदनाम करण्याचा कट रचला आहे. श्री सूर्या समूहाची प्रगती खुंटवण्याचे हे षड्यंत्र आहे. गुंतवणूकदारांच्या मदतीनेच हा कट आपण हाणून पाडणार आहो, असे श्री सूर्या समुहाचे प्रमुख समीर जोशी यांनी उशिरा रात्री ‘लोकमत‘शी स्वत: संपर्क साधून आपली बाजू मांडताना स्पष्ट केले.
साभार
(10-08-2013 : 00:21:18)    
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NagpurEdition-2-2-10-08-2013-4d1fa&ndate=2013-08-10&editionname=nagpur

No comments:

Post a Comment