Monday, September 16, 2013

श्री सूर्या समूह ची चिटफंड चीटिंग: पुढारी-अधिकार्‍यांचा काळा पैसा फसलेला

मुख्यालयातून दस्तऐवज बोलावले : स्वत:ला वाचविण्यासाठी धावपळ
नागपूर : गुंतवणूकदारांना २00 कोटी रुपयांनी फसवणार्‍या श्री सूर्या इनव्हेस्ट कंपनीमध्ये पुढारी आणि अधिकार्‍यांनी काळ्या पैशांची गुंतवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब उघडकीस येऊ नये म्हणून पुढारी आणि अधिकारी कामाला लागले आहेत.

श्री सूर्याच्या विद्यानगर येथील मुख्य कार्यालयात रविवारी दिवसभर पाहणी सुरूच होती. या तपासात काही मोठय़ा गुंतवणूकदारांचे दस्तऐवज हाती लागले असल्याची चर्चा आहे. परंतु बहुतांश दस्तऐवज अगोदरच गायब करण्यात आले आहेत. तपासात गोपनीयता राखली जात असल्याने पोलीसही काही बोलायला तयार नाहीत. याच दरम्यान आयकर विभागही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी प्रतापनगर ठाण्यात श्री सूर्या इनव्हेस्ट कंपनीचे समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जोशी दाम्पत्याच्या सीताबर्डी, जोशीवाडी येथील घरावर, छत्रपती चौकातील शाखा कार्यालयावर आणि प्रतापनगरच्या विद्याविहार स्थित मुख्यालयात छापे मारले होते. पोलिसांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विष्णू भोवे यांनी रविवारी दिवसभर विद्याविहार येथील मुख्यालयाची तपासणी केली. पोलिसांना येथून केस व्हाऊचर, प्रामिसरी नोट, चेक आणि गुंतवणूकदारांचे दस्तऐवज हाती लागले. जोशी दाम्पत्याने गुंतवणूकदारांना साडेबारा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत केले. त्यामुळे लोकांचा विश्‍वास वाढला.

फसवणूक झालेल्यांची संख्या पाच हजारांवर
जोशी दाम्पत्यांकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. पोलीस काही निवडक लोकांच्याच तक्रारी दाखल करून घेतात. ही प्रथा बदलवण्यात यावी आणि प्रत्येकाची स्वतंत्र तक्रार दाखल करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

२२ कोटी बुडाले
जोशी दाम्पत्याकडे एका कोळसा किंगचे २२ कोटी रुपये बुडल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या भीतीमुळे तो समोर यायला तयार नाही. एकेकाळी विधी क्षेत्राशी जुळलेली एक व्यक्तीही कारवाईनंतर भूमिगत झाली आहे.

फसवणूक सुरूच
कमी वेळात दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचा प्रकार नवीन नाही. पाच वर्षांपूर्वी कळमना अर्बन सोसायटीच्या नावावर प्रमोद अग्रवाल याने ४00 कोटी रुपयांनी फसवणूक केली. गेल्या वर्षी जयंत झामरे आणि त्याची पत्नी वर्षा झामरे यांनीही सुमारे २५ कोटी रुपयांचा चुना लावला.

स्वस्तात साखर देण्याच्या नावावर प्रमोद निनावे याने अनेक राज्यातील उद्योगपतींना ३00 कोटी रुपयांनी फसविले. विटेल कंपनीनेसुद्धा याच पद्धतीने १00 कोटी रुपयांची फसवणूक केली. देशातील अनेकांची फसवणूक करणारा उल्हास खैरे आणि त्याची पत्नी रक्षा हेसुद्धा नागपूरचेच आहेत. तसेच २0 कोटी रुपयांचा चुना लावून पळालेला हरिभाऊ मंचलवार दोन वर्षांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (प्रतिनिधी)
साभार
(16-09-2013 : 00:25:58)    
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NagpurEdition-2-2-16-09-2013-24467&ndate=2013-09-16&editionname=nagpur

No comments:

Post a Comment